सिॲटल हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशाच्या उत्तर पश्चिमी भागातील सर्वात मोठे शहर आहे. हे एक बंदर असून, वॉशिंग्टन राज्यात आहे. कॅनडा…सिॲटल हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशाच्या उत्तर पश्चिमी भागातील सर्वात मोठे शहर आहे. हे एक बंदर असून, वॉशिंग्टन राज्यात आहे. कॅनडाच्या सीमेपासून हे साधारणतः १५४ कि.मी. दक्षिणेला आहे. सिॲटलच्या परिसरात ४००० वर्षांपासून मनुष्यवस्ती आहे, पण युरोपी लोकांची वसाहत १९व्या शतकात सुरू झाली. पहिले युरोपी रहिवास्यांमध्ये आर्थर डेनी होते जे नोव्हेंबर १३, १८५१ला सिॲटलला पोचले. १८५३ साली, डॉक मेनर्ड यांने मुख्य वसाहतीला "सिॲटल" नाव द्यावे असे सुचविले. २००६ साली मुख्य शहराची लोकसंख्या ५,८२,१७४ होती व अख्या परिसराची लोकसंख्या साधारणतः ३३ लाख होती. सिॲटल परिसराला 'प्युजेट साउन्ड' असे सामान्यत: म्हणले जाते, ज्यात टकोमा, बेलव्ह्यू आणि एव्हरेट ही शहरे सुद्धा मोजली जातात. १८६९ ते १९८२ पर्यंत, सिॲटल 'क्वीन सिटी' म्हणून ओळखली जायची. सिॲटल हे आता 'एमरल्ड सिटी' या उपाधीने ओळखले जाते. हे नाव १९८० च्या दशकात एका स्पर्धेत ठरवले गेले आणि ते ठेवण्याचे कारण आहे सिॲटल भवतालच्या प्रदेशातली वर्षभर हिरवी राहणाऱ्या झाडांची जंगले. सिॲटलला 'गेटवे टू अलास्का', 'रेन सिटी', 'जेट सिटी' या नावांने सुद्धा ओळखले जाते. सिॲटलच्या रहिवास्यांना 'सिॲटलाइट्स' म्हणले जाते.